"माझी इतकी परीक्षा कोणी घेतली नाही हो... शप्पथ... पण मी परीक्षेला बसते... नव्हे, बसावंच लागतं आणि बरेचदा चांगल्या मार्कांनी पासही होते."
"काय गं, आता कोणत्या परीक्षेला बसत्येस?" सुषमाने आत येत विचारलं. मी म्हणाले, " अगं, आपल्या मुलीच काढतात पेपर, 'surprise test' आणि आपण हिरिरीने तो सोडवतो. तेच सांगत होते विद्याला.
सकाळी 11 च्या सुमारास मोबाईल वाजला की मोबाईल मध्ये न बघताच समजतं, लेकीचा फोन असणार. सकाळी 11 किंवा संध्याकाळी 8 च्या सुमारास फोन वाजला की मी सतर्क होते. 'या तो नवीन सोल्युशन, या तो नवीन इन्व्हेंशन.' अटीतटीची वेळ कायमच.
" आई, छोले करत्ये, तेल तापत ठेवलंय, आधी काय घालू? कांदा मसाला की छोले?"
" आई गंSSS छोले आधीच घालून झाले, कांदा लसूण घालायचेच राहिले, आता काय करू?"
ऐक ना, घरात हे हे जिन्नस आहेत, पाहुणे येतायत. पटकन बनेल असा पदार्थ सुचव आणि कृती पण सांग, पटकन...