अहो या फोडणीच्यासुद्धा किती विविध आठवणी असतात… खाद्यपदार्थ आपल्याला आठवतात आणि तोंडाला पाणी सुटते. काही वैशिष्ट्ये आठवतात. उदाहरणार्थ, शांत थंड झालेली निवांत फोडणी म्हणजे आजीच्या हातचे कालवलेले लोणचे . लोणचं आणि आजी दोन्ही आठवतात. भरपूर तेल, हिंग, मोहरीची खमंग फोडणी म्हणजे आठवते ती चैत्रातली कैरीची डाळ आणि खमंग काकडी. लसूण तेलात घालून केलेली झणझणीत वांग्याच्या भरताची फोडणी, तूप टाकून केलेली मेथीच्या संमिश्र सुवासाची कढीची फोडणी तर लोखंडी पळीत केलेली असते.

बघार, तडका, छौक अशा विविध नावाने, पण भारताच्या सर्व प्रांतातील खाद्यपदार्थांमध्ये फोडणी ही हजर असतेच. बिहार किंवा उत्तर प्रदेशामध्ये सरसोच्या तेलात, तर दक्षिणेकडे खोबरेल तेलात. घटक पदार्थ बहुतांश सारखेच असतात, परंतू प्रमाण थोडे पुढे मागे चवीप्रमाणे असते. छान फोडणी होण्यासाठी तेलाचे तापमान महत्त्वाचे असते. पण या सर्वात आपली महाराष्ट्रातील पळी ची फोडणी मात्र स्पेशल हां.. लांब दांड्याची लोखंडी पळी खरपूस तापलेली आपल्या फोडणी सकट पदार्थाच्या पोटातच शिरते, व लगेच मुरवण्यासाठी झाकण ठेवल्याने आपले लोहतत्व त्या पदार्थाला बहाल करते .उपासाच्या पदार्थांना देतो त्या तुपाच्या “सात्विक” फोडणीचा सुवास तर चौफेर दरवळतो. काही पदार्थात कोळसा तापवून त्याचा स्वाद दिला जातो ती “दगडाची फोडणी”, रेस्टॉरंट मध्ये कढईत तेल घालून त्यातच जाळ करतात ती असते “नखरेल फोडणी”. एकूण काय, तर फोडणी हे स्वयंपाक घरातील भरतवाक्य .छान जमलेली फोडणी पदार्थाला चार चाँद लावते तर बिघडलेली (म्हणजे तेल खूप तापले तरी आणि कमी टाकले तरी ) पदार्थाचा बट्ट्याबोळ करते.
फोडणीचे सर्व घटक पदार्थ, म्हणजे मोहरी, हिंग, हळद, आरोग्याच्या खूप समस्या दूर करणारे आणि आपले सर्व गुणधर्म तेलात सामावून टोकणारे असतात. पोषक व आवश्यक घटक पदार्थ अत्यंत रुचकर स्वरूपात आपल्या पोटात जाण्यासाठी हा एक स्वयंपाक घरातील अन्न संस्कारच आहे म्हणानां. मोहरी मध्ये आयर्न, कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी असिड आणि मॅग्नेशियम असते. मोहरी आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर करते .पोटाचे विकार दूर होतात, तसेच पचनक्रिया सुधारते. मोहरीचे तेल तर अनेक उपायी व अफाट फायद्याचे आहे .गरम तेलात मोहरी पडली की तडतडते व त्यातील तेल गरम तेलात मिसळते. मोहरी उष्ण, तर जिरे थंड. तेही पाचन तंत्र सुधारतेच व स्वाद आणि सुगंध पण वाढवते. त्याच बरोबर अॕनिमिया दूर करण्यासाठी व कॅल्शियम मिळण्यासाठी उपयुक्त असते. कधीतरी त्यात घातला जाणारा ओवा व खूपदा टाकली जाणारी लसूण हेही स्वाद आणणारे व वातनाशक आहेत. लसूण आणि हिंगाचे औषधी उपयोग बरेच आहेत. परंतू हे सगळे पदार्थ आपण जसेच्या तसे खाऊ शकत नाही तर फोडणीच्या माध्यमातून आणि योग्य प्रमाणात आपल्या पोटात सहज जातात. मिरची आणि कढिपत्त्याचे तर काय, अगदी कढत तेलात स्वतःला होरपळून घेतात व स्वाद-सुगंध पदार्थाला देऊन खाणार्याने अलगद बाजूला काढून ठेवले, की कोपर्यात जाऊन बसतात.

एकूण काय तर तेलाच्या योग्य तापमानात क्रमाक्रमाने पण प्रमाणात सर्व जिन्नस पाठोपाठ पडतात आणि पदार्थांना एक न्यारीच रुची येते. भारतीय खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या यो तेला-तुपाच्या फोडणीने अनेक वर्ष नुसतेच आपल्या पदार्थांना रुचकर बनविले नाही, तर आपल्या खाद्यापदार्थांची जगभरात विशेष अशी ओळखदेखील निर्माण केली आहे. आत्मनिर्भर होताना जसे आपण स्वतःतील सगुण शोधून स्वतःचे बळ वाढवतो, तसेच या काही सोप्या पण आपल्या खाद्य संस्कृतीतील महत्वाच्या गुणांचं महत्व तेवल ठेवणंदेखील गरजेचं आहे.