Blog

वदनी कवळ घेता….

“चला मुलींनो पटपट पाटपाणी घ्या, आणि उष्टशेण कोण करणार ते पण आधीच ठरवा, नंतर कटकट नकोय “.  आम्ही लहान असताना बऱ्याच घरातून हे वाक्य कानावर पडायचे. आता ‘पाटपाणी ‘आणि ‘उष्ट शेण ‘,हे दोन्ही शब्द विस्मरणातच गेलेत .आम्ही पटापट पाटपाणी करून सर्व जण जमले, कि मग तालासुरात वदनी कवळ व्हायचे ,आणि जेवण सुरू व्हायचे .आई-बाबा आम्ही सर्व भावंडे एकत्र गोल बसून, जेवणं सुरु व्हायची. दिवसभराची सर्वांची बडबड अगदी चढाओढीने चालायची. क्वचित कधी बाबा पण नेमके तेव्हाच रिझल्ट चा विषय काढायचे. पण आई मात्र ,”पोरांना जरा शांतपणे जेवू द्या, नंतर घ्या त्यांना फैलावर.” असे म्हणून बाजू घ्यायची. आम्ही जरा मोठे झाल्यावर मात्र, सर्व दिवसभराच्या गमतीजमती सांगत, मस्करी करत, चिडवत, जेवणाचे हात सुकेपर्यंत गप्पा चालायच्या. काय छान जेवणे होती ती. घरातली कुणी व्यक्ती नसेल तर थांबायचे, पण सर्वांनी एकत्र येऊनच जेवायचे असा अट्टाहासही होत असे .

विशेषतः सुट्टीत आमची मावस भावंडे आली, की तेव्हा आम्ही काय मज्जा करत जेवायचो. माझे वडील एकेक किस्से रंगवून सांगणार, आणि आम्ही हसत-खिदळत तासनतास जेवणार…. असेच चालायचे. आजही ही ती जेवणं हा आमच्या आठवणींचा प्रमुख विषय असतो. असे दिवस पुन्हा येणे नाही. हल्ली प्रत्येक जण आपापले वाढून घेऊन, टी.व्हीपुढे सोफ्यावर बसतो तेव्हा हे फार जाणवते. कोणाचेच लक्ष काय जेवतो ह्यात नसते. आपण आपले खात असतो आणि टीव्हीवर पाहत असतो .

हल्ली लहान मुलांनासुद्धा मोबाईलवर गोष्ट लावून द्यायची व भरवायला घ्यायचे. बाळ यांत्रिकपणे तोंड उघडते, आणि खात राहते. पुढे मात्र ते अॅडिक्शन होते. सुरवातीला वाटते की छान जेवतोय, पण नंतर मात्र तेच मूल त्या वाचून अडून बसते .काही समजावण्याच्या पलीकडे जाते आणि आपण फक्त हतबल होतो. गेल्या लॉक डाऊनमध्ये आमच्या नातवानेच फतवा काढला. आपण सिरीयल मधल्या सारखेच सर्वजण टेबलवर बसून एकत्रच जेवण करूया. खूप दिवस त्याप्रमाणे केले. खरंतर सर्वांनाच खूप छान वाटत होते. पण काही महिन्यांनी हा उत्साहही मावळला. रोज आई मागे लागायची मुलांच्या की टेबलवर तयारी मांडा. मग त्यापेक्षा सोफ्यावर बसून जेवणे सोयीचे वाटायला लागले. पण काही पदार्थ असे डिशमध्ये घेऊन खायचेच नसतात ना! उदाहरणार्थ, पिठलं भात, मऊ भात, तूप पापड लोणचं, खिचडी कढी, पिठले भाकर, पुरणपोळी हे कसे खाणार डिश मध्ये. त्यासाठी ताटच हवे. आजसुद्धा, छोटा ऋग्वेद नैवेद्याचं ताट असले की खुश असतो. आणि नैवेद्याचे ना, मग सगळे संपवतो. सर्व नातवंडांनासुद्धा गणपतीतले, ललिता पंचमीचे, भाऊबीजेचे जेवण आवर्जून आठवते. काय मज्जा येते ना असं म्हणत आठवत बसतात. आजही पुन्हा असा प्रयत्न करायला हरकत नाही. पाट पाणी नाही, पण “खाना लगावूँ” ,किंवा चला रे लवकर म्हणताच टेबलापाशी जमा होणे होऊ शकते. टीव्ही नाही लावला जेवताना तर ‘सोने पे सुहागा’. खरंतर खाली मांडी घालून जेवायची परंपरा आपली. पण निदान टेबलाशी बसून जेवायला जमतंय का बघू. एकवेळचे जेवण तरी असे करुया.