Blog

चातुर्मासाचा आरंभ

आषाढी एकादशी
चातुर्मासाचा आरंभ
सणवार दर दिवशी
व्रत वैकल्यांना प्रारंभ

बाहेर कोसळणारा पाऊस आणि एकंदरीतच बाहेरचे वातावरण आपल्याला जरा अंतर्मुख करतेच.. आपण कांदे नवमी साजरी करतो. पावसाळ्यातच असते ना ती. (नंतर कांदा खाणे जरी वर्ज्य करणार नसलो तरी) निमित्त कांदेनवमीचे. तेवढीच मज्जा!!
आषाढी एकादशीचे वातावरण किती आधी पासूनच तयार होते. वारकरी, दिंडी, दिंड्या हल्ली शाळेतून सामुदायिक काढल्या जातात. सगळे वातावरणच अगदी ‘विठुमय’होते. धार्मिक बनते. उपासाच्या पदार्थांच्या रेसिपीपण यायला लागतात. आषाढीचा उपाससुद्धा सर्वत्रच (खरे तर रुचीपालट म्हणूनच) केला जातो. पण तरीसुद्धा त्या दिवसानंतर कुठेतरी आई आजीने केलेले नियम, चातुर्मासातली व्रते ही आपल्याला आठवतातच. काही वेळेला आपण लहानपणी अनुभवलेले श्रावण सोमवार, मंगळागौर, श्रावण शनिवार, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र हेही आवर्जून आठवतात त्यातले वेगळेपण, त्यामागे असलेले शास्त्र व आत्ताच्या काळाप्रमाणे आवश्यकतेची सांगड घालावी असेही अंतर्मुख होतानाच जाणवते.
पूर्वीचे उपवासाचे प्रकार पहा ना. फलाहार, नक्त, धान्य फराळ, चुलीवरचे बनवलेले काहीही न खाणं, हॉटेलिंग बंद, इत्यादी. ठरवले तर ते आपल्या मनाच्या संयम, कंट्रोल ह्याच्याशीच जोडले जाते. खरे तर आत्ताही कटाक्षाने डाएट करणाऱ्या लोकांना हे वेगळे वाटणार नाही. पूर्वी ते धर्माच्या आड होते इतकेच. आतासुद्धा आपण ठरवलं तर फक्त ‘ताजे सुपाच्य’ च रुचकरच खाईन. घरात बनवलेलेच खाईन असे काही ठरवू शकतो.. मला एक आठवते, आमची आई नेम म्हणून रोज श्रीकृष्णाला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवायची. अंतस्थ हेतू हाच होता की आपल्या मुलांच्या पोटात रोज लोणी नक्की जाईल. अशा तऱ्हेचे सुद्धा आपण काहीतरी, थोडं शुगर कोटेड, थोडं नेम म्हणून, किंवा मुलांना खाण्यापिण्यातली शिस्त लागावी म्हणून काही वेगळे नियम करू शकतो का? विचार करायला नक्कीच हरकत नाही.चातुर्मासात आवर्जून पाळले की पुढे सवय लागते, पटते.

हे झालं खाण्यापिण्याच्या बाबतीत. अन्य बाबतीतसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नियम करून बघायला हरकत नाही. चातुर्मासात केले म्हणजे चार महिने आपण ठरवले म्हणून करणार आणि पुढे ते सवयीचे होणार हा ही एक हेतू. आपण जर काही काळाकरता मोबाईलचा उपवास, काही काळाकरता मौन, म्हणजेच मनातल्या मनात आपल्या मनाशी संवाद, किंवा आपला मी टाईम मिळवणं ह्याकरतासुद्धा एखादा नियम करू शकतो.
सतत आपण पळापळ करतच असतो, सतत काही ना काही तरी करतच असतो जरा वेगळे काहीतरी करून बघू शकतो..
तसंच ह्या संपूर्ण चातुर्मासात येणारे सण समारंभ, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन यासारखे सार्वजनिक आणि वैयक्तिक हे सर्व समारंभ आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार करून बघू शकतो. आपल्या मुलांच्या आनंदाबरोबरच, आपण त्यातून काही विधायक करू शकतो का? काही वेगळा विचार करू शकतो का? काही विचार करून बघायला हरकत नाही त्याची उदाहरणे ही फार द्यायला पाहिजेत असं नाही. कारण त्यात प्रत्येकाला कल्पकतेने करण्याला वाव आहे!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *