खूप वर्षं घरी राहिल्यानंतर नोकरी निमित्त एकटी राहायला लागले होते. सुरुवात म्हणून होस्टेल वरच राहत होते एका. नाही म्हणायला खाण्या-पिण्याची सोय होती. पण होस्टेलची मेस ती, नाही म्हटलं तरी ६०-७० लोकांचा ३ वेळचा स्वयंपाक म्हटल्यावर क्वालिटीवर परिणाम व्हायचाच. मग कधी आठवड्यातून एकदा, मग दोनदा असं करत करत मी रात्रीचं जेवण बाहेरूनच मागवायला लागले होते. आधी मजा वाटली, पण एवढ्यावेळा बाहेरचं म्हणजे जरा चुकल्या चुकल्या सारखं वाटू लागलं; शिवाय तिथल्या किचनमध्ये ना काही करावंसं वाटायचं, ना ऑफिसनंतर काही स्वयंपाक करायची शक्ती उरायची.